Hajamat books and stories free download online pdf in Marathi

हजामत

हजामत.
आता माहीत नाही;पण पूर्वी गावाकडे परंपरागत बलुतेदार पद्धत आस्तित्वात होती.या पद्धतीमध्ये गावातली कामे “पेंढी” वर करून घेतली जायची. (कदाचित महाराष्ट्रात वा देशात वेगवेगळ्या भागात या पद्धतीला वेग वेगळी नावे असू शकतील ,या पद्धतीत गावातले मोठे शेतकरी गावातल्या बलुतेदारांना वर्षाला काही ठराविक पायल्या धान्य वा काही रक्कम द्यायचे, व त्याबदल्यात त्या शेतकऱ्याची वर्षभराची सगळी कामे त्या संबंधीत बलुतेदार मोफत करून द्यायचा!) या पद्धतीप्रमाणे समजा त्या घरातली कुणाची चप्पल दुरुस्त करायची झाली तर संबंधीताकडून ती दुरुस्त केली जायची, शेतातल्या अवजारांची दुरुस्ती सुतार, लोहार गरजेप्रमाणे करून द्यायचे,ठरलेला नाभिक त्या घरातील पुरुषांची हजामत करून द्यायचा, कोंबडी बकरी कापायचे काम गावातला मुलानी करायचा.कुंभार वर्षभराची गाडग्या मड्क्याची गरज भागवायचा!
अशा कामाच्या मोबदल्यात वर्षातून एकदा पेंढी (धान्य ई.) हाच काय तो मोबदला त्यांना मिळायचा. बड्या शेतकऱ्यांककडून अशी पेंढीची पध्दत सर्रास वापरली जायची.ही एक प्रकारची बार्टर सिस्टीम होती.बरेच जमीनदार कामे करून घ्यायचे;पण वेळेत मोबदला द्यायचे नाहीत....
छोटे शेतकरी मात्र आपली कामे रोखीने करून घ्यायचे.आज बहुतेककरून ही पद्धत नामशेष झाली असावी.
मी अल्पभूधारक घरातला होतो,त्यामुळे माझी कामे रोखीनेच करून घ्यावी लागायची.
मी शाळेत शिकत असतानाची ही गोष्ट आहे. त्या दिवशी माझा वर्गमित्र बाळ्या आणि मी,दोघांनाही शाळेतल्या मास्तरांनी केस कापून घ्यायला सांगितले.बाळ्या गावातल्या मोठ्या जमीनदार घरात जन्मलेला होता.
दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेजण एकाच वेळी केस कापायला शंकरकाकाच्या दुकानात गेलो.त्या काळी पंचवीस पैशात कटिंग करून मिळायची,तर तुळतुळीत गोटा पंधरा पैशात करून मिळायचा!
आमचे बाळ्यासारखे ‘पेंढी’ खाते नव्हते.माझे कटिंगचे पैसे रोख मिळणार असल्याने शंकरकाकाने मला लगेच कटींगच्या खुर्चीत बसवलं.
“ काय रे गोटा करायचा ना?” काकाने विचारले.
“ नाहीSSनाही, कटिंग करायचीय.” मी घाईघाईनं बोललो.
न जाणो बोलता बोलता अर्ध्या डोक्यावरून शंकर काकाचा वस्तरा फिरायचा!
“चार आणे आणल्यात ना?”
“हो आणल्यात ना!” मी घाईघाईने खिशातली पावली काकाला दाखवली!
आता काकाने हातातला वस्तरा ठेवला आणि मशीन घेतली. सावकाश कट कट करीत मशीन चालू लागली.डोक्यावरच्या केसांचा बदलता आकार आरशात दिसायला लागला. काकांनी माझे व्यवस्थित केस कापले.वस्ताऱ्याने मानेच्या बाजूलाही कोरून कोरून आकार दिला.
कापलेले केस झटकून पाण्याचा फवारा मारला आणि टॉवेलने मस्तपैकी डोके पुसून दिले.भांग पाडून दिल्यावर मागून आरसा दाखवला.
शंकरकाकाने माझी कटिंग भलतीच मन लाऊन केली होती. आरशात बघितले,आता मी मस्तच दिसत होतो!
बाळ्या बाकड्यावर बसून पंधरावीस मिनिटे मान वाकडी वाकडी करून माझ्या डोक्यावरची चालू असलेली कारागिरी मन लावून बघत होता. कटिंग झाल्यावर मी ऐटीत खिशातले चार आणे काढून शंकरकाकाला दिले आणि बाकड्यावर बाळ्याशेजारी जावून बसलो.
शंकरकाकाने खुर्ची झटकली आणि बाळ्याला म्हणाला-
“चल, बस रे आता तू .”
बाळ्याही ऐटीत खुर्चीवर बसला.
शंकराकाकाने काही विचारण्यापुर्वीच बाळ्याने शंकराकाकाला फर्मान सोडले ...
“ माझीसुध्दा त्याच्यासारखीच कटिंग करा बर का!”
“ त्याच्यासारखीच कटिंग करतो हो बाळ्या तुझी, डोळ्यात केस जातील,खुर्चीवर डोळे मिटून शांत बस!”
शंकरकाकाने वस्ताऱ्याला भिंतीवर लावलेल्या पट्ट्यावर घासून घेतले.बाळ्याच्या डोक्यावर पाण्याचा फवारा मारला आणि त्याची मान पकडून वस्तरा या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरवला!
बाळ्याच्या तोंडातून काही शब्द येण्यापूर्वीच शंकरकाकाने बाळ्याचे चकोट करायला सुरुवात केली होती!
बाळ्याने “काका कटिंग करा ना,म्हणेपर्यंत वरचे टक्कल उघडे झाले होते!”
बाळ्या रडायला लागला;पण पुढच्या पाच मिनिटांत बाळ्याचा चमनगोटा करून झाला होता!
“मला कटिंग करायची होती ना,मग गोटा का केलाss” म्हणून बाळ्याने भोकाड पसरले.
“ तुला कटिंग पायजेल काय? जा दादाला सांग दोन वर्षाची पेंढी रहायलीय ती द्यायला,आणि हे बघ पुढच्या वेळी याच्यासारखे रोख चार आणे घेवून ये, मग देतो याच्यासारखी कटिंग करून,काय?”
“चला निघा आता!”
मुकाट्याने बाळ्या बाहेर पडला.
मला उगीचच आपण शंकरकाकाला रोख पैसे देतो याचा अभिमान वाटला!
.....© प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020.