Mala Kahi Sangachany - 16-1 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय...- १६-१

रुग्णवाहिका कुमारला जिल्हा रुग्णालय येथून घेऊन निघाली . सूर्य डोक्यावर आलेला ... आजूबाजूला धुराचे लोट तर रस्त्यात वाहनांची गर्दी , सुरळीत वाहतूक सुरु राहावी यासाठी मध्येच येणारे स्पीड ब्रेकर ... चौक आला की लाल दिवा लावून ट्रॅफिक सिग्नल वाटेत एक आणखी नवा सोबती थांबायला भाग पाडत होता तर एकीकडे भरधाव वेगाने एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली ... कुमारला मात्र या सगळ्या गोष्टींची काहीएक जाणीव नव्हती ... त्याचे वडील मायेनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते . तो जणू डोळे मिटून या दुनियेपासून अलिप्त अश्या वेगळ्याच दुनियेत हरवला होता...


त्याच्या मागेच काही अंतर ठेवून ऑटोने त्याची आई , प्रशांत आणि आकाश येत होते ... ती माऊली ऑटोतून मान बाहेर काढून त्या रुग्णवाहिकेला पाहत होती पण जसजशी वेळ जात होती ते अंतर वाढत होत... एक क्षण असा आला की रुग्णवाहिका गर्दीतून वाट काढीत दिसेनाशी झाली ...


रस्त्यात येणाऱ्या वाहनांच्या गर्दीला तोंड देत सुजित दुचाकी घेऊन बसस्थानकाजवळ पोहोचला . तर तिथं पुन्हा त्याला प्रवाश्याची गर्दी अन मध्येमध्ये येणाऱ्या बसचा सामना करावा लागला ... मग कसातरी वाट काढीत तो एका दाट हिरव्यागार कडूलिंबाच्या झाडाजवळ पोहोचला , घामानं शरीर चिंब ओलं झालं होतं , तापत्या कडक उन्हात झाडाखाली दुचाकी उभी करून तो थंडगार सावलीने सुखावला मग मोबाईल बाहेर काढून त्याने तिला फोन लावला ...


" हॅलो ... सुजित बोलतोय "


" हॅलो ... बोल सुजित "


" मी बसस्थानका जवळ आलो , तु कुठे आहे ? "


" मी इथंच तर आहे ....." आजूबाजूला नजर फिरवत ती म्हणाली


" तुला कडूलिंबाचं झाडं दिसत आहे का ? मी झाडाखाली उभा आहे "

तसं तिने ते झाडं शोधत नजर फिरवली " हो दिसलं ... मी आलेच तू थांब तिथेच " म्हणत तिने फोन कट केला , ती सुजीतकडे जायला लागली ... दहा बारा पावलं चालत नाही तर ती त्या झाडाखाली पोहोचली ...


त्याच्या जवळ उभी राहून .....

"तू इथं आला मी तिथं बसस्थानकाजवळ तुझी वाट पाहत होते "


" सॉरी पण तिथं वाहनाची जरा जास्तच ये जा सुरु आहे .... म्हणून... "


" अरे , दवाखाना कोणता ते सांगितलं असत तर मीच आले असते ऑटोने ... "


मग त्याने कुमारला दुसऱ्या दवाखान्यात दाखल करावं लागल्याचं तिला सांगितलं ... अन तो तिला सोबत घेत दुचाकीवरून जायला लागला ... वाटेत तिने त्याला प्रश्न करत कालपासून ते या क्षणापर्यंत काय , कसं झालं ते सर्व विचारून घेतलं आणि त्याने तिला कुमारची डायरी त्यात लिहिलेलं गुपित हे सोडून बाकी सर्व सांगितलं ... कुमार अजूनही बेशुद्ध आहे सांगितल्यावर ती अबोल झाली ... मग तो सुद्धा जरा वेग वाढवून दुचाकी चालवायला लागला पण दुसऱ्या क्षणी त्याला कुमारचा चेहरा आठवला अन त्याने ब्रेक लावत वेग कमी केला....

इकडे हे असं घडत असता आर्यन राहत असलेल्या ठिकाणी ....


कुमारला भेटायचं म्हणून तो सर्व काम तसेच सोडून HR ला भेटण्यात वेळ वाया न घालवता तसाच ऑफिसमधून निघाला . सुजितने त्याला कुमारच्या अपघाताची बातमी दिली तसाच तो HR ला सुटीचा अर्ज ईमेल करून रूमवर आला .त्याने तिकीट आधीच ऑनलाइन काढून घेतलं ... पटकन बॅगमध्ये हवं ते सामान घेऊन तो रेल्वे स्टेशनला पोहोचला ... रेल्वे यायला अर्धा तास वेळ होता , प्लँटफॉर्म वर आल्यानंतर त्याने बॅग खाली ठेवली , तो तिथल्या बाकावर रेल्वे येण्याची वाट पाहत बसला ... मनात विचारांचं वादळ उठलं, कुमार ठीक तर असेल ना ? त्याला फार लागलं की काय ? .....


इतक्यात रेल्वे काही वेळातच प्लॅटफॉर्मला येणार अशी अनौन्समेंट त्याच्या कानावर पडली , तो भानावर आला ... पाच एक मिनिटांनी कर्कश सिटी देत रेल्वे आल्याची त्याला दिसून आली ... रेल्वे थांबते न थांबते तर लोकांची चढण्याची घाई सुरु त्याचबरोबर उतरण्याची सुद्धा ..... दाराजवळ उभा राहून तो गर्दीत उभा राहिला आणि आपोआप तो आत शिरला... सुदैवाने खिडकीजवळ जागा मिळाली , तो बॅग बाजूला ठेवून तिथं बसला .... पुन्हा शिट्टी देत रेल्वे स्टेशनला निरोप देऊन , प्रवाश्यांना घेऊन रेल्वे निघाली....


आर्यन शिक्षण पूर्ण झाल्यावर या शहरात एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता ... या नवीन शहरात येऊन त्याला जवळ जवळ दोन वर्षे पूर्ण झाली होती . सुरुवातीला जरा नवीन शहराशी जुळवून घ्यायला वेळ लागला पण सुशिक्षित बेरोजगार म्हणवून घेण्यापेक्षा या परिस्थितीचा सामना करावा असं ठरवून त्याने इथेच जम बसविला ... पण तो मित्रांसोबत संपर्कात होता हीच त्याची खास ओळख , कुमारला तो दर एक दोन दिवसाआड फोन करत होता .... कुमार सोबत त्याची ओळख झाली ती पदवीला प्रथम वर्ष्याला असतांना ... मग कधी ते जिवलग मित्र झाले त्यांना कळलं नाही , पदवी पूर्ण झाली आणि सोबतच मास्टर्सला प्रवेश घेतला ... त्यामुळे ते आणखी दोन वर्षे सोबतच होते ... एकूण काय तर सलग पाच वर्षे ते दोघे जण एकत्र होते ...


सतत संपर्कात राहिल्यानेच नातं अतूट बनतं ... जीवाभावाची नाती जुळतात ... कधी कधी तर ही नाती रक्ताच्या नात्यापेक्षा जवळची वाटायला लागतात ... असचं काही कुमार आणि त्याच्या मित्रांबद्दल होतं .... म्हणूनच त्याचा अपघात झाल्याचं कळताच आर्यन सगळं तसंच सोडून त्याला भेटायला निघाला ....

यांचा असा प्रवास सुरू असता अनिरुध्द राहत असलेल्या शहरात ....

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी तो घरापासून दूर या नवीन शहरात राहत होता ... जिथे तो एका खाजगी कंपनीत ज्युनियर इंजिनियर म्हणून सहा महिने पूर्वी रुजू झाला ... तसं त्याने कुमारला फोन करून सांगितलं होतं ... तर वेळ मिळेल तसा तो फोन करून त्याच्याशी बोलत होता ... काल रात्री सुद्धा त्याने कुमारला फोन केला होता पण मोबाईल बंद असल्याने तो त्याच्याशी बोलू शकला नाही ..... जेव्हा त्याला कुमारचा अपघात झाला असे कळलं त्याला काही सुचेना ... अचानक असं काही घडलं हे त्याचं मन मानायला तयार नव्हतं ... म्हणूनच या धक्क्यातून सावरायला त्याला जरा वेळ लागला . मग तोही लगेच मॅनेजरला सांगून कुमारला भेटण्यासाठी निघाला.... रेल्वे वेळाने जाणार असं समजल्यावर तो बस ने प्रवासाला निघाला ... हवं ते एका बॅगमध्ये सोबत घेऊन तो बसमध्ये बसला, ऊन्ह चांगलंच तापत होतं त्यात आणखी एक भर म्हणजे सुटी असल्याने बस प्रवाश्यांच्या गर्दीने पूर्ण भरली ... त्या गर्दीत कशीतरी जागा मिळवून तो बसमध्ये बसला आणि एकदाची बस सुरु झाली . धावपळ सुरू होती त्यामुळे त्याला विचारांची जाणीव होत नव्हती पण आता बसमध्ये बसल्यानंतर मनात कित्येक विचार एकामागून एक येत होते ... इतक्यात त्याचा मोबाईल वाजला ...


" हॅलो ... अनिरुध्द , मी आर्यन .."


" हॅलो .... आर्यन अरे तू कुठे आहेस आता ..? "


" मी रेल्वे मध्ये आहे तुला सांगायचं होत की कुमारचा अपघात झाला .."


" कळलं मला सुजीतकडून ... मी निघालो तिकडे जायला ..."


" ठीक झालं मला वाटलं कदाचित तुला माहित नसेल ...."

" मी तुला सांगणार होतो पण तूच कॉल केला ... "


" ते जाऊ दे , तू कॉल केला काय आणि मी केला काय एकच तर आहे ..."


" हो बरोबर आहे मी बसने येत आहे तेव्हा तू मला बस स्थानकाजवळ भेट .... तेथून दोघे सोबत जाऊ ... "


" ठीक आहे ... तू पोहोचला कि मला कॉल कर .. "


" हो ओके ठेवतो फोन " म्हणत त्यांनी फोन कट केला ...

continue...