Dhukyataln chandan - 11 books and stories free download online pdf in Marathi

धुक्यातलं चांदणं....... भाग ११

पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छतेने भरलेलं. विवेकने ओळखलं." अजून तुझी सवय गेली नाही वाटते.… पावसात भिजण्याची. अजूनही कॉलेजमध्ये आहेस वाटते… " विवेकच्या मनाला लागलं कुठेतरी. मान खाली घालून तो तसाच उभा होता. थोड्यावेळाने त्याने मानसीला विचारलं,
" कशी आहेस ?",
" मजेत आहे, आनंदात आहे.",
" छान आहे.",
"तुझं काय चालू आहे… जॉबला आहेस का ?… कि फक्त कथा-कविता लिहिण्यात वेळ घालवतोस अजून. " जणू काही मानसी त्याचा अपमान करायलाच आली होती.विवेकला पुन्हा वाईट वाटलं. एकेकाळी त्याच्या कवितांवर वेडी होणारी, आज त्याला त्यावरच बोलून दाखवत होती.
" जॉबला आहे मी आणि कधीतरी लिखाण करतो. तुझं काय चालू आहे ?",
" माझं… हे हॉटेल आहे ना, ते माझ्या होणाऱ्या नवऱ्याच आहे. " विवेकच्या मनात झालं काहीतरी. तो काही बोलला नाही त्यावर.
" congratulations !! , चल मी निघतो. ", म्हणत विवेक निघाला.
" मी आहे मुंबईत, हा महिनाभर. नंतर नाशिकला रहायला जाणार आहे. आलास तर ये कधीतरी. बोलायचं आहे तुझ्याबरोबर. " विवेक ते ऐकत होता. होकारार्थी मान हलवली आणि स्टेशनच्या दिशेने निघाला.


पूजा आज वेगळ्याच आनंदात होती. प्रेमात पडली होती ना ती विवेकच्या. त्यात पाऊस, romantic वातावरण अगदी. पूजा घरी आली. तिला तर भानचं नव्हतं. घराबाहेर सुद्धा ती थोडीशी भिजली. " पूजा…. ये पूजा… " त्या आवाजाने ती जागी झाली. तिच्या आईचा आवाज होता तो. घाबरून गेली ती. तशीच हळू पावलांनी पूजा वर आली. वडील समोरच बसले होते.
" काय गं… कूठे भटकत होतीस ? "वडिलांनी पेपरातून डोक वर न काढताच विचारलं.
" Friend कडे गेली होती." पूजा दबक्या आवाजात म्हणाली.
" आणि भिजलीस कशी ?" आईने प्रश्न केला तसं वडिलांची नजर पूजावर गेली.
" काय ग… छत्री होती ना.",
" sorry बाबा… विसरली मी, घरीच. ",ते उत्तर ऐकून वडिलांचा पारा चढला.
" अक्कल आहे का जरा, असेल तर वापरा ती. लहान नाहीस तू… सकाळपासून पाऊस धरलेला. आणि छत्री न घेताच बाहेर गेलीस. पण मी म्हणतो , पावसाचं बाहेर जायचेच कशाला… एवढं काय काम होतं महत्वाचं मैत्रिणीकडे ?" पूजा गप्पच उभी होती.
" आणि तुझं लक्ष कूठे असते गं. आपली मुलगी कशी वागते, काय करते … जरा लक्ष नको का तिच्यावर." वडील आता आईला ओरडत होते. आईसुद्धा निमुटपणे ते ऐकत होती.
" आता काय इथेच सुंभासारखी उभी राहणार का ?… जा आत आणि कपडे बदल… तिकडे सगळं पाणी गळते आहे कपड्यातून… जा आत. " तशी पूजा आत पळाली.


थोडयावेळाने पूजा बाहेर हॉलमधे आली. आई कपड्यातून गळलेले पाणी पुसत होती. पाऊस एव्हाना होता. वडील नव्हते हॉलमधे.
" आई, बाबा कूठे गेले ?",
"ते ना… आताच बाहेर गेले, पाऊस होता ना सकाळपासून म्हणून थांबलेले. कमी झाला तसे गेले ते, काही काम होतं त्यांचं." पूजा आईजवळ आली.
"Sorry आई… " पूजाने आईला मिठी मारली.
" अगं… लादी तर पुसू दे. आणि sorry कशाला ?",
"बाबा ओरडले ना माझ्यामुळे तुला…sorry.",
"वेडी गं वेडी… आईला कोणी sorry बोलते का आणि त्यांचा स्वभाव माहित आहे ना तुला. मग छत्री कशी विसरलीस.",
"विसरली नाही गं… मुद्दाम भिजायला गेली होती.",
"लबाड… ",म्हणत आईने पूजाच्या गालावर चापटी मारली.
" आणि कूठल्या मैत्रिणीकडे गेली होतीस ?" तशी पूजा गप्प झाली.
" काय झालं गं ?",
"मैत्रीण नाही.",
"मग कोणाकडे… ",
" Friend आहे माझा."आईच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.
"Boy-Friend ? ",
"नाही गं , आई. मित्र आहे फक्त.",
"ठीक आहे, पण यांना कळू देऊ नकोस हा. चहा देऊ का तुला… भिजून आलीस ना, बरं वाटेल तुला.",
"Thanks आई." पूजा आईला म्हणाली. तेवढयात वडील आले.
"श्शी !!! काय हा पाऊस… थांबतच नाही." पूजाकडे नजर गेली. " काय madam… भिजून झालं ना… आता कूठे जायचे आहे पुन्हा." तिने नकारार्थी मान हलवली.


"ठीक आहे… आणि उद्या बँकमधून सुट्टी घे.",
"का बाबा?",
"उद्या तुला बघायला येणार आहेत." पूजाला धक्का बसला.
"पण बाबा… मला नाही करायचं लग्न एवढयात… " ते ऐकून वडिलांना अजून राग आला.
" मग काय म्हातारपणी लग्न करणार का. ते काही नाही, उद्या सुट्टी घे आणि तयारीत रहा. चांगलं स्थळ आहे. मुलगा अमेरिकेला जॉबला असतो. मुंबईचाच आहे. कळलं.",
"पण बाबा !!!",
"बस्स झालं… विषय संपला. आणि चहा दे मला करून. "आई चहा करायला आत गेली, पूजा पुन्हा तशीच उभी पुन्हा.
" आता जरा चांगल्या मैत्रिणीची संगत ठेव. लग्न होणार आहे तुझं आता. गचाळपणा करू नकोस. "पूजा चुपचाप स्वतःच्या रूम मधे आली. बाल्कनीत येऊन उभी राहिली. पावसाचा जोर कमी झाला होता. मागोमाग आई चहा घेऊन आली."पूजा… बाळा, घे चहा." पूजाने नाही म्हणून मान हलवली.आईला जरा वाईट वाटलं. तिच्या बाजूला येऊन उभी राहिली. दोघीही पावसाकडे पाहत होत्या.


"मलाही पाऊस आवडायचा पहिला. खूप आवडायचा. दरवर्षी येणाऱ्या पावसात भिजण्याचा मी आनंद घ्यायची आणि वेड्यासारखी भिजायची. लग्न झालं, सगळं बंद झालं. तुझ्या बाबांना आवडत नाही म्हणून मी सोडून दिलं पावसात भिजणं. आताही मन होते पण नाही जाऊ शकत." पूजाच्या डोळ्यात पाणी आलं.
" पण आई, मला एवढ्यात नाही करायचं लग्न. बाबांना सांग ना प्लीज…आणि मी तर आज पहिल्यांदा भिजली पावसात, त्यातला आनंद अनुभवला आज मी. आणि लगेच सोडून देऊ भिजणं. त्या विवेकला काय वाटेल मग.",
"कोण विवेक ",तशी पूजा बोलायची थांबली.
" कोण विवेक… पूजा ",
" माझा friend , त्याच्या सोबत मी फिरायला जाते. ",
"म्हणजे रोज जातेस का ? ",
"रोज नाही, सुट्टी असली कि",
" बरं ठीक आहे.",
"तो खूप चांगला आहे गं, लेखक आहे, चांगला जॉबला आहे. त्यानेच शिकवलं मला, बाहेर मोकळेपणाने फिरायला. शिवाय मनाने सुद्धा चांगला आहे तो.",
"बरं मग… ",
"अगं आता तर आमची मैत्री झाली आहे आणि लगेच बाबांनी लग्न ठरवलं. नको आहे मला."आई पूजाकडे पाहत म्हणाली.
"पूजा… तूझ्यात आणि विवेकमधे काही आहे का…असेल तर मनातून काढून टाक. तुझ्या बाबांना आवडणार नाही ते.",
"अगं… मला आवडतो फक्त तो, मैत्री आहे.",
" आणि मैत्रीचं राहू दे. तुझ्या बाबांना हे कळू देऊ नकोस. उद्या सुट्टी घेतेस ना… ",
"पुन्हा तेच आई… मला नाही करायचं आहे लग्न एवढयात.",
"अशी का वागतेस तू… ते लगेच लग्न कर असं नाही सांगत आहेत. फक्त बघ. चांगला मुलगा आहे तो… एकदा बघून तर घे." पूजा तरी गप्पच.

"हे बघ बाळा… तू तरी ऐक माझं, ते तर माझं कधीच ऐकत नाहीत.निदान तू तरी ऐक ना… ",
"अगं… पण आई." पूजाच्या आईने हात जोडले तिच्यासमोर,
"प्लीज म्हणते तुला… तुम्हा दोघांमध्ये मी अगदी दमून जाते. ते ऐकत नाहीत आणि तू रागावून बसतेस.काय करू मी आता." पूजाला गहिवरून आलं.
"नको आई… हात नको जोडूस… घेते उद्या सुट्टी मी."ते ऐकून आईला आनंद झाला.
"thanks पूजा… आणि एक गोष्ट,प्रॉमिस कर… चुकीचा कोणताच निर्णय घेऊ नकोस घाईने." पूजाने आईच्या हातातलं चहाचा कप घेतला आणि बाल्कनीत उभी राहून बाहेर पाहत उभी राहिली.छान वातावरण जमलेलं बाहेर. अनेक couple's बाहेर आले होते आता. त्यांना बघून विवेकची आठवण झाली. नाही… विवेक बद्दल विचार नाही करायचा. तिने स्वतःच्या मनाला सांगितलं. आईला प्रॉमिस केलं आहे ना… विवेक पासून दूर राहायला पाहिजे आता.


=============== क्रमश: ==================