AGENT - X (11) books and stories free download online pdf in Marathi

AGENT - X (11)

११. फायनल वर्डीक्ड् -

मिस्टर वाघनं मिथिलची ती 'मॉसबर्ग एमसी वन एससी' ही सबकॉपॅक्ट सेमी ऑटोमॅटिक नाईन एमएम पिस्टल माझ्यासमोर ठेवली. पण आज माझं त्या गनकडं लक्ष नव्हतं.
"सबकॉपॅक्ट सेमी ऑटोमॅटिक नाईन एमएम कॅलिबर! कपॅसिटी फ्लश-फिट मॅगझीनमध्ये सहा राऊंड व एक्सटेंडेड् मॅगझीनमध्ये सात राऊंड. लांबी सहा पॉईंट पंचवीस इंच. वजन सहाशे तेवीस पॉईंट सात ग्रॅम. फुल्ली लोडेड् अँड इसी टू रेग्युलर कॅरी. खूप कम्फर्टेबल आहे! " तो म्हणाला.
मी भयंकर धक्क्यात होतो. तो काय बोलतोय हे त्यावेळी माझ्या कानात गेलं फक्त पण डोक्यात शिरलं नाही...
मी विचार होतो, की मिस्टर वाघची प्रत्येक केस अधिकाधिक खतरनाक होत चालली आहे आणि मी त्याचा इच्छा नसताना एक अविभाज्य भाग होत आहे...

"म्हणजे हानियाला माहीत आहे, की तुम्ही तिच्या गार्डीयनचे खुनी आहात... आणि तरी तिनं तुमच्या वर विश्वास ठेवला?..."
"कारण सिदातच्या 'गो अहेड' म्हणण्यातून माझ्या विषयी त्यानं जो विश्वास दर्शवला होता, तो तिनं अनुभवला होता.
"सिदातला विश्वास वाटला होता, की तो मेल्यानंतर मी हानियाची काळजी घेईन म्हणूनच कोणत्याही चिंतेविना तो माझ्या हातून मरायला तयार झाला. त्याच्या हातून झालेल्या खूनांचं प्रायश्चित्त यातूनच होईल असं त्याला वाटलं होतं. आणि हीच त्याची इच्छा होती. म्हणून मला त्याला मारावं लागलं!"
'तुम्ही त्याला का मारलंत?' या माझ्या प्रश्नाचं उत्तर मिस्टर वाघनं मी न विचारताच मला दिलं होतं...

"तुमचा आणि त्याचा संवाद कधी झाला?" मी विचारलं.
"मिथिलच्या घरी येताना वाटेत. सिदातला ड्रग्स दिलं गेलंय हे स्पष्ट होतं. पण कोणतं, ते शोधून काढायला व त्यानुसार त्याला मेडिसीन्स द्यायला माझ्याकडं तेवढा वेळ नव्हता. म्हणून त्याला मी 'कॅफिन' हे ड्रग दिलं. हे सेंट्रल नर्व्हस सिस्टीमला उत्तेजित करत. मेंदूपर्यंत पोहोचल्यावर घेणाऱ्या व्यक्तीमध्ये अलर्टनेस येतो. व्यक्तीला अधिक जागृत होते आणि थकवा कमी होतो. म्हणून डोकेदुखी, आणि मायग्रेनचे उपचार करण्यासाठी औषधामध्ये कॅफिन हा एक कॉमन घटक आहे. कॅफिनचा परिणाम तासाभरात होऊ लागतो आणि तो तीन ते चार तास राहतो.
"त्यामुळं सिदात मिथिलच्या घरी येण्याच्या प्रवासातील तासाभरात शुद्धीवर आला. तेव्हा मी त्या पर्टीक्युलर वेळी मला गरजेची होती तेवढीच माहिती त्याच्याकडून जाणून घेतली होती आणि या दरम्यान तयार झालेला माझा प्लॅन मी त्याला सांगून हजारेची गन त्याला दिली होती.
"मरणाची इच्छा पण त्याचवेळी त्यानं बोलून दाखवली होती. अनेक हत्यांचं हे ओझं घेऊन तो या पुढं जगू शकणार नाही असं तो मला म्हणाला आणि त्यानं हानियाला इथून पुढं सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली..." मिस्टर वाघ अत्यंत गंभीरपणे म्हणाला.

पण मला एक गोष्ट माहीत आहे, सिदातनं विनंती केली नसती, तरी मिस्टर वाघनं सिदातला मारलं असतं आणि हानियाची पण काळजी घेतलीच असती. जी तो घेतो आहे...

"मग जर खूनी एकच व तो सिदात होता, तर खून करण्याचे प्रकार वेगवेगळे कसे होते?" हा प्रश्न अजून माझा पिच्छा सोडत नव्हता. म्हणून मी मिस्टर वाघला तो विचारलाच!
"प्रत्येक वेळी सिदातला खून करण्यासाठी वेगवेगळी हत्यारं दिली जायची. सिदात पण एक्स मरीन असल्यानं तो तसा कोणतंही वेपन युज करण्यात एक्सपर्ट होताच. ड्रगच्या प्रभावाखाली असूनही वेपन्सनुसार सिदात खून करायचा!"
पुन्हा एक प्रश्न होताच! तो म्हणजे,
"मिथिलनं सिदातला ऑफिस मध्येच ठेवलेला असून कोणत्याच बोर्ड मेंबरला आधी संशय नाही आला, की तो त्याचा वापर खून करण्यासाठी करतोय?"
"पोलिसांसाठी ट्रुथ सिरम बनवण्याच्या नावाखाली मिथिल सिदातवर ड्रग प्रयोग करत होता. त्याचे वडील अदीप भारद्वाज जिवंत असतानाच तो प्रस्ताव त्यानं बोर्ड मेंबर्स कडून सहमत करून घेतला होता. अदीप यांच्यावर सगळ्याचा विश्वास असल्यानं कोणी आपत्ती दर्शवली नाही व तो प्रस्ताव पारीत करण्यात आला होता.
"त्यामुळं त्याचे सिदातवर ट्रुथ सिरमचे एक्सपरिमेंट्स चालू आहेत असं वाटून सगळ्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण नंतर कॉन्फरन्स मध्ये मिथिलनंच सत्य सगळ्यांसमोर रिव्हील केलं होतं ना!"
"पण सिदात हानियाला घेऊन इतर कुठं न जाता भारतातच का आला?" मला हा प्रश्न उद्विग्न करत होता.
कारण तो इथं आला नसता, त्याच्या सोबत असं काही घडलंच नसतं... या जर-तरच्या गोष्टी ना काही अर्थ नसतो. ते आपल्या हातातही नसतं. पण जेव्हा काही वाईट घडतं, तेव्हा असे प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे...
"इंडियन ओरिजन असल्यानंच नाही, तर भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळं तो हानिया सोबत भारतातच सेफ राहू शकेल असं त्याला वाटत होतं म्हणून!"
(त्याचं म्हणणं बरोबर होतं; पण आत्ताची ग्राऊंड रिएलिटी वेगळी आहे... हे सिदातच्या नंतर लक्षात आलं असणार... असो!)


हानियाची इथून पुढची सगळी देखभाल मिस्टर वाघ करत आहे...
आयुष्यात इतकं सगळं पाहून-भोगून हानिया किती तटस्थ आहे... अगदी मिस्टर वाघ सारखी...!
आयुष्याकडे बघण्याची सकारात्मकता तिनं अजूनही सोडलेली नाही. हे तिच्या वागण्यावरून आणि चेहऱ्यावरील त्या मोहक हसण्यानं मला पटवून दिलं होतं...

"पण मुळात तुम्ही सिदातला मारण्यापासून हजारेला अडवलंतच का? आणि नंतर तुम्ही त्याला कुठं घेऊन जात होतात?"
"त्याच्या हातून मला हजारेला मारायचा होता! मिथिलची सगळी माहिती पण मला काढून घायची होती म्हणून त्यावेळचं त्याचं मरणं मी काही काळ पोस्टपोन केलं. पुढं तो मरणारच होता...!" मिस्टर वाघ थंडपणे म्हणाला.
पुन्हा काही काळ शांततेत गेला. आणि मग काही तरी आठवल्यासारखं अचानक बोलून मिस्टर वाघनं शांतता भंग केली.
म्हणाला,
"तुला माहिती आहे, नांव बदलताना सिदातनं करीमची मुलगी हिना हिला 'हानिया' हे नांव दिलं. हानिया म्हणजे हॅपी! आनंदी! नांवाप्रमाणे आहे ती नाही?! तिच्या नांवाला ती जागते!
"सिदातचं पण खरं नांव अथर्व होतं. ज्यावेळी त्यानं नांव बदलण्याचं ठरवलं, त्यावेळी 'सिदात' हे हानियानं त्याला नावं दिलं होतं, सिदात... म्हणजे 'लॉर्ड' किंवा 'परमेश्वर'! हानिया हा शब्द अथर्वसाठी 'देव' म्हणून वापरायची!
"हं! तिच्यासाठी तो देवच तर होता... पण काय करणार? देवालाही मरण चुकलेलं नाही..."
"तुम्ही हे सगळं कसं समअप करणार आहात?" मी अत्यंत थंडपणे मिस्टर वाघला विचारलं.
"हजारेला कुणी मारलं?"
"तुम्ही!"
"मित्च! कोणाच्या हातून?" त्यानं वैतागल्या सारखं विचारलं.
"सिदातच्या.
"राईट! आणि मिथिलला कोणी मारलं?"
"सिदातनं!"
"मग मी कुठं आडकतोय?"
"पण सिदातला तर तुम्ही मारलंत ना!" मी कळवळीनं म्हणालो.
"बट आय वॉज वेअरिंग हँडग्लव्ह्ज् आणि शिवाय मी हजारेचीच गन युज केली होती. सिदातवर पॉईंट ब्लँक फायर करून सिदातनं स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली आहे असा सेटअप मी उभा केला."
"आणि ती नर्स?"
"ती कोणत्याच अडचणीत आपण अडकू नये म्हणून कधी या संदर्भात स्वतःहून तोंड नाही उघडणार. शिवाय घाबरून पळून जाताना तिनं नीट मला पाहिलंच कुठं होतं.
"दुसरं म्हणजे ती तिथं होती हे इतर कोणाला माहीत नाही. आणि ज्यांना माहीत होतं त्यातील हानिया सोडून कोणी जिवंत नाही. हानिया पर्यंतही कोणी पोहोचणार नाही, कारण ती तिथं होती हे पण कोणाला माहीत नाही. आणि हानिया पर्यंत कोणी पोहोचलंच, तर हानिया या संदर्भात कोणाला काही बोलणार नाही याची मला खात्री आहे. मग चौकशीसाठी त्या नर्स पर्यंत पोहोचणारच कोण? आणि कसं? असं काही व्हायचं असतं, तर आतापर्यंत झालं असतं. आणि काही झालंच, तर मी सांभाळेन. यू नो दॅट. सो डोन्ट वरी...!"
त्यानं मला आश्वासित केलं.


दुसऱ्या दिवशी मी हिंमत एकवटून हॉस्पिटलला हानियाला भेटायला गेलो... त्याही वेळी तिच्या चेहऱ्यावर तेच चैतन्यमय स्मित होत. गोड हसून तिनं मला अभिवादन केलं होतं. पण यावेळीही मी तिच्याशी काहीच बोललो नाही.
आईनं केलेल्या जेवणाचा डबा तिच्या बेडजवळच्या टेबलवर ठेवला आणि तिच्याकडं एक नजर पाहून मी बाहेर पडलो. तिची आणि माझी नजरानजर झाली, पण तिच्या नजरेला नजर देण्याची हिंमत माझ्याच्यानं झाली नाही. मी तिच्या वॉर्ड मधून बाहेर पडलो.
बाहेर मिस्टर वाघ भिंतीला टेकून हाताची घडी घालून उभा होता. मला बाहेर आलेलं पाहून तो सरळ उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं.
"तुम्ही इथं...?" मी अडखळत विचारलं.
"मी इथं असण्याचं आश्चर्य नाही. पण तू इथं कसा?" मला हॉस्पिटल बाहेर घेत त्यानं विचारलं.
"लग्न करणार तिच्या सोबत?" त्यानं अनपेक्षित प्रश्न विचारला.
मी भांबावलोच! काय बोलावं मला सुचेना...
"म... मी...?" मी चपापत विचारलं...
त्यावर तो हसला,
"जस्ट किडींग! आय नो तुला तिच्याविषयी आदर आहे आणि म्हणूनच तुला तिची काळजी वाटत आहे. अदर् वाईज् तुझ्या मनात तिच्याविषयी काही नाही. मला तुझी स्तिथी माहीत आहे. वी बोथ आर सेलिंग इन द सेम बोट सूरज! वी आर बोथ द सेम!"
तो नेहमी असं काही तरी बोलतो, पण त्याला नेमकं काय बोलायचं आहे ते मात्र त्यानं रीतसर लपवून ठेवलंय. तो त्याचा वर्तमान तर माझ्या समोर उलगडतो, पण त्याचा भूतकाळ मात्र त्यानं लपवून ठेवलाय.
मिस्टर वाघ जरी असं म्हणत असला, तरी त्याचा एकटेपणा दूर करण्यासाठी त्याला मी हवा असतो. तो समुद्रा सारखा आहे. सगळं काही समावून घेणारा, तरी आपली मर्यादा न लांघणारा. पण समुद्राचाही कधी तरी बांध फुटतोच; आणि तसा मिस्टर वाघची सहनशीलताही! म्हणून तर गोष्टी जेव्हा त्याला त्रास द्यायला लागतात, तेव्हा तो माझ्याकडं येतो. आपलं मन मोकळं करायला...
हं! तो मला त्याचा कन्फेक्शन बॉक्स म्हणतो...
मिस्टर वाघ मग समोर पाहत गंभीर होत मला पुढं म्हणाला,
"तुझं नांव खूप मार्मिक आहे. सूरज! माझ्या आयुष्यातला अंधार घालवतोस तू!"

पण माझ्या समोरील प्रश्न होता, की माझ्या आयुष्यातला अंधार कोण मिटवणार...?

एकटेपणा आम्हाला सहन होत नाही. किमान मला तरी...
पण स्त्री ही मानसिक दृष्ट्या कीती सबळ असते याची प्रचिती मी माझ्या आईच्या माध्यमातून खूपदा घेतली आहे... हानियाचं नवं व ताजं उदाहरण सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहेच...

खरंच! एकटं राहण्याचं धाडस एक स्त्रीच करू जाणे...

मिस्टर वाघ बोलतच होता...
मी मात्र स्तब्ध उभा होतो... भविष्यात अजून काय काय विचित्र व भयंकर पण तरीही जगाचं खरं रूप दाखवणाऱ्या घटना पहायला मिळणार आहेत हे आत्ताच समजणार नसून त्याचा भाबडा अंदाज घेत...

पण या विलक्षण घटनांनी एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली, की...

"ह्युमॅनिटी हॅज नो बॉण्ड्स ऑफ रिलीजन्स् अँड नॅशनॅलिटी; अँड रिलीजन्स् आर नॉट रेलेटेड टू टेररीजम्! एव्हरी थिंग इज् रिलेटेड् अँड रिव्हॉल्व्स अराऊंड टू दि पर्सनल इंटरेस्ट्स ओन्ली! अँड धिस इज द ट्रु वर्ल्ड् वी आर लिव्हिंग इन...!"

"मानवतेला धर्म व राष्ट्रीयत्वाच्या सीमा नाहीत; आणि दहशतवाद हा देखील धर्माशी संबंधित नाही! इथं प्रत्येक गोष्ट स्वार्था भोवती फिरते आहे! आणि हेच आपण रहात असलेल्या या जगाचं खरं रूप आहे!

"आता?" मी मिस्टर वाघकडं पाहत त्याला विचारलं.
त्यावर त्यानं थंडपणे उत्तर दिलं,
"हजारेची बायको अजून जिवंत आहे!"

......................................…...……………......................................................................................


समाप्त!