Paris - 4 books and stories free download online pdf in Marathi

पॅरिस – ४

०८ मे, २०१८

सकाळी ५ वाजताच उठलो.. झोप पूर्ण झाली नव्हतीच, हवेत प्रचंड गारठा होता त्यामुळे परत पांघरुण ओढून झोपायचा मोह आवरत नव्हता. शेवटी २ मिनिटं, ५ मिनिटं करुन उठलो, पटापट आवरु म्हणूनही ६.१५ होऊन गेले होते. अजून मेट्रो पकडायची होती, तेथून पुढे काही अंतर चालून जाऊन मग ब्रुजला जाणाऱ्या बसचा थांबा होता.

धावतच खाली उतरलो, काही अंतर पुढे गेलो आणि लक्षात आले, अरे आपण दुसऱ्या देशात चाललोय, दुसऱ्या गावाला नाही. व्हिसा, पासपोर्ट काहीच बरोबर घेतले नव्हते. परत माघारी येऊन पासपोर्ट्स घेतले आणि अक्षरशः धावतच स्टेशन गाठले. अर्थात त्यामुळे डोळ्यावर असलेली झोप उडून गेली. दोनच मिनिटांत मेट्रो आली. मेट्रोचे अंतरंग रंगेबिरंगी दिवे, रंगीत खुर्च्यांमुळे एकदम झांन्गो वाटत होते. १५ मिनिटांतच स्टॉप आला. जिने चढून मुख्य रस्त्यावर आलो आणि समोरचं दृश्य बघून स्तिमीतच झालो. लगेच कॅमेरा काढला आणि क्लिक-क्लीकाट चालू केला.

जुन्या इमारती, नक्षीदार पूल, स्वच्छ पाण्याने दुथडी भरुन वाहणारी seine नदी, वाऱ्याच्या झुळकीने डुलणारी झाड.. वाह सगळंच लाजवाब होतं. ७ वाजायला पाचंच मिनिटं बाकी होती, “लवकर चल, लवकर चल” म्हणून बायको घाई करत होती, पण माझ्यातला फोटोग्राफर मला शांत बसू देईना. शेवटी त्यांना पुढे जाऊन बस पकडा, मी आलोच २ मिनिटांत म्हणून पुढे पाठवले.

सूर्याची कोमल किरणं इमारतींना अजूनच मोहक बनवत होती. किती फोटो काढू आणि किती नाही असे झालं होतं. त्या पुलाचे आणि नदीचे अजून काही क्लोज-शॉट्स घेऊन मागे वळलो आणि समोर दिसले ते अवाढव्य पसरलेले Louvre Museum. असं म्हणतात हे म्युझियम व्यवस्थित बघायचं असेल तर निदान दीड ते दोन दिवस लागतात. अनेक उच्च दर्जाच्या कलाकृतींबरोबरच जगप्रसिद्ध ‘मोनालिसा’च पेंटींग सुद्धा इथेच आहे.

Louvre Museum

दुर वर बस थांबलेली दिसत होती, भरभर चालतानाच आजूबाजूचे अजून काही फोटो घेतले आणि बसकडे धावलो.

बसमध्ये बसतानाच आपण जेथे जाणार आहोत तिथला नकाशा आणि बघायची प्रेक्षणीय ठिकाणं, त्याची माहिती वगैरे दिली गेली. संध्याकाळी बस बिचाऱ्या ड्रॉयव्हरलाच स्वच्छ करावी लागते त्यामुळे बस मध्ये काहीही खाणं-पिणं अलाऊड नाही वगैरे सूचना देऊन बस निघाली.

पॅरिस अजूनही सुस्तावलेलेच होते, रस्ते बरेचसे रिकामेच होते. मधूनच एखादी पोर्शे किंवा फेरारी कानाला सुखावणारा आवाज करत जाई तोच काय तो आवाज. बाकी गर्दी असो कि नसो, एक जात सगळेजण सिग्नल पाळत होते. बंद काचेतून पॅरिसचा सौदंर्य न्याहाळत असतानाच बाहेरच्या ठिकाणांची माहिती टूर-गाईड देत होता ते ऐकत होतो. बसमधील बहुसंख्य प्रवासी स्पॅनिश असावेत, त्यामुळे टूर गाईड सगळी माहिती आधी फ्रेंच, मग स्पॅनिश आणि मग इंग्लिश मधून सांगत होता. काही वेळातच बस पॅरिसच्या बाहेर पडली आणि भला मोठ्ठा हायवे सुरु झाला. सगळ्या गाड्या आपल्या आपल्या लेन्स व्यवस्थित पाळत होत्या. पुढची गाडी स्लो झाली तर मागचीही स्लोच होणार, पण लेन कट करुन, ओव्हरटेक करुन जाणं नाही म्हणजे नाही.

काही वेळातच टोल नाका आला. ५-६ नाही तर तब्बल १५ लेन्स होत्या. एकाही ठिकाणी पैसे गोळा करायला माणूस नाही. गाडी जवळ आली कि तेथे लावलेल्या कॅमेरातून गाडीचा नंबर टिपला जायचा, तिथल्या एका मशीन मध्ये क्रेडिट-कार्ड सरकवले कि झाले काम. पुढचा बॅरिकेड आपोआप उचलला जायचा. टोटल टाइम टेकन फॉर टोल इज १० सेकंड्स.

त्यापूढीलही कुठल्याही टोलवर गर्दी लागली नाही. एका वेळी पुढे २ गाड्या होत्या हीच काय गर्दी.

इथे म्हणे बहुतेक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या ड्रायव्हरला दर दोन तासांनंतर २० मिनिटांचा ब्रेक घेणं कंपलसरी आहे. नियम मोडलेला आढळल्यास त्या वाहनाचे, ड्रॉयव्हरचे किंवा त्या प्रवासी कंपनीचेही लायसन्स जप्त होऊ शकते. एका छोट्या मॉटेलवर, एक छोटा ब्रेक घेऊन ४ तासांतच आम्ही बेल्जीयमला पोहोचलो. गंमत म्हणजे एका देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात कधी प्रवेश केला ते कळलेही नाही. कुठेही नावालासुद्धा बॉर्डर नव्हती, पोलीस किंवा चेकिंग लांबची गोष्ट. साधं ‘वेलकम टू बेल्जीयम’ वगैरे पण नाही म्हणजे कमालच होती.

टूर गाईडने पुन्हा एकदा मॅप मध्ये कुठे फिरायचे, काय बघायचे दाखवले आणि परत ह्याच ठिकाणाहून इतक्या इतक्या वाजता बस निघेल सांगून निरोप घेतला. बस मधून बाहेर आलो तेंव्हा सकाळचा गारठा नावालाही नव्हता, ऊन जाणवत नसले तरी उकाडा जाणवत होता. आम्ही ब्रुज मध्ये प्रवेश केला आणि पॅरिस आणि ब्रुज इतक्या जवळ जवळ असूनही दोन्हींमध्ये असलेला कल्चरल विरोधाभास लगेच जाणवला. आतापर्यंत बघितलेल्या पॅरिसमधल्या बहुतेक इमारती ह्या साधारण एकाच रंगातल्या होत्या, पिवळसर छटा असलेल्या, बाकीचे रंग अगदी नावापुरते असत. जी गोष्ट इमारतींच्या रंगाची तीच तऱ्हा लोकांच्या कपड्याच्या रंगाचीही. बहुतेक लोकांचे कपडे हि जास्ती करून पांढरे, क्रीम रंगाचे किंवा राखाडी रंगाचे.. फॅशन प्रत्येकाची वेगळी, पण रंग तेच. ह्या उलट बेल्जीयम विविध रंगात न्हाऊन निघाले होते, रंगीत इमारती, रंगीत कपडे घातलेली लोकं.. सगळंच रंगेबिरंगी.

आधी म्हणालो तसं इथे उन्हाळा नक्कीच जाणवत होता. बहुतेक लोक अतिशय कमी कपड्यातच फिरत होती. हिरवळीवर अनेक नयनरम्य दृश्य सन बाथ घेत, पुस्तक वाचत पहुडलेली दिसत होती. इथल्या रस्त्यांना रस्ते का म्हणावेत असाच मला काहीसा प्रश्न पडला होता. छोट्या छोट्या लेन्सचं जाळंच सगळीकडे पसरलेले होते. ९०% लोकं ही एकतर चालत किंवा सायकलींवर होते.

ब्रुजचे प्रमुख आकर्षण म्हणजे इथल्या कॅनल्समधुन केलेली बोटीची सैर. आम्ही लगेच तिकीट काढली आणि रांगेत थांबलो. थोड्याच वेळात आमचा नंबर लागला. ह्या कॅनल्स मधून बहुतेक ब्रुजचे दर्शन घडते. आमच्या बोटीचा ड्रॉयव्हर थोडा वयस्कर पण प्रचंड रंगेल, उत्साही आणि फनी होता. असे असे ‘वन लायनर्स’ टाकायचा कि हसून हसून वाट लागायची.

ह्या सुंदर कॅनल्स मुळेच बहुदा ब्रुजला ‘व्हेनिस ऑफ द नॉर्थ’ म्हणत असावेत.

तास-दीड तास फेरफटका मारुन मग एका बागेत आम्ही थोडा वेळ विसावलो. भूक लागली होती. आजूबाजूला खाद्यपदार्थांची रेलचेलही होती, पण आम्हाला खुणावत होते ते सोबत आणलेले ‘कल्याण-भेळ’चे रेडी-टू-मेक पाकीट. मग मस्त चुरमुरे, फरसाण, चिंचेचे आंबट गोड, आणि तिखट पाणी आणि मग त्या हिरवळीवर बसून मस्त ती भेळ हाणली.

खाण्याचा कार्यक्रम उरकल्यावर बाजारात फेरफटका आणि शॉपिंग मस्ट होते. दुकानं तर बेल्जीयम चॉकलेट्सनी खचाखच भरली होती. शेवटी एका दुकानात शिरलो आणि अधाश्यासारखी चॉकलेट्स खरेदी केली. डार्क चॉकलेट्स, व्हाईट चॉकलेट्स, जम्बो, कँडी, मिक्स-नट चॉकलेट्स.. कित्ती व्हरायटी होती. दुकानात शिरायच्या आधीच स्वाती-ताईने सांगितले होते, किंमती बघून गुणिले ८१ वगैरे करून कन्व्हर्जन करायचे नाही.. नाहीतरी सगळंच महाग वाटेल. आपण तरी कुठे पुन्हा पुन्हा बेल्जीयम ला येणारे म्हणून दिल खोल के खरेदी केली. काही दुकानांमध्ये फ्रिज ला लावायचे बेल्जीयम मोमेंटोज वाले मॅग्नेटस होते ते घेतले. बिलाचा आकडा जास्तीच फुगायला लागला तास काढता पाय घेतला.

बरोबर दिलेला मॅप आणि रस्त्यावरील पाट्यांची जुळवाजुळव करत बाकीची ठिकाणं पण फिरलो. कित्तेक दिवसांनी खरं तर इतकं चाललो होतो. पण हवा चांगली असल्याने दमायला असं कधी झालं नाही, हां पण पायाचे मात्र तुकडे पडायचेच बाकी होते. रस्त्याने येणाजाणारा जो तो एक तर आईस्क्रीम नाहीतर बिअर घेऊनच फिरत होता. शेवटी मग एका आईस्क्रीम पार्लर कडे मोर्चा वळवला.

City Hall

समोरच मोठ्ठा सिटी-हॉल उभा होता. १४२१ साली बांधलेली ही इमारत अजूनही इतक्या सुस्थितीत उभी आहे हे बघून पुन्हा एकदा आश्चर्य वाटून गेले. साहजिकच पुण्याचा रहिवासी असल्याने पहिल्यांदा आठवला तो शनिवारवाडा. १७३२, म्हणजे तब्बल तीन शतकं नंतर बांधलेला शनिवारवाडा आज कुठल्या स्तिथीत आहे. बाहेरुन तरी परिस्थती ठीक म्हणायची, पण आतून? काय राहिलंय त्याच बघायला? परदेशी पाहुण्यांकडून आपण ५००रु. तिकिटं घेतो आणि आत गेल्यानंतर काय दाखवतो आपणं त्यांना?

का आपली मानसिकता अशी आहे? आपल्याच वास्तूचं जतन आपण का नाही करू शकत? अजून किती दिवस आपण भ्रष्ट राजकारण, पैसे खाऊ वृत्ती, जात-भेद, हिंसा, आसुया, द्वेष आपल्यात जिवंत ठेवणार आहोत? पॅरिसमध्ये सुद्धा इतक्या जुन्या जुन्या इमारतींच संवर्धन इतक्या सुंदर पद्धतीने केलेले दिसते. चौदाव्या, पंधराव्या शतकात कधी काळी बांधलेले प्रीझन्स आज हॉस्पिटल्स होते, वर्ल्ड-वॉर च्या काळात बांधलेल्या सैनिक छावण्या आज शाळा, कॉन्सिल हॉल्स किंवा लायब्ररी होते. आपल्याकडेही काही अंशी जतन होते, नाही असे नाही, पण त्याच प्रमाण हातावर मोजता येतील इतकंच कदाचित असावं.

रस्त्याने चालताना आजूबाजूच्या मोहक घरांचा आणि त्या अनुषंगाने त्यात घरात राहणाऱ्या लोकांचा हेवा वाटून गेलाच. मागच्या जन्मी ह्यांनी असं काय पुण्य केलं असावं कि ह्या जन्मी त्यांना इथे राहायला मिळाले असावे असेच वाटत होते.

Basilica of the Holy Blood, Old St. John’s Hospital, Saint Salvator’s Cathedral, Provincial Court च्या इमारती सुंदर होत्याच पण विशेष उल्लेख करावा लागेल तो १३व्या शतकातले The Church of Our Ladyचे. ही इमारत खरोखरच सुंदर होती, ब्रुज मधली सगळ्यात उंच इमारत असल्याने, बहुतेक सर्व ठिकांणांवरुन दिसायची, पण नुसती ब्रुजमधली उंच एवढेच त्याचे वैशिष्ट्य नव्हते तर ती जगातली दोन नंबरची विटांपासून बनवलेली उंच वास्तु आहे.

परतायची वेळ झाली तसं आम्ही बस स्टॉपला येऊन थांबलो.

[क्रमशः]