प्रलय - १५

प्रलय-१५

      आरुषी व मोहिनी जंगलात पोहोचल्या होत्या . काही अंतर चालल्यानंतर जंगली लोकांसारखी वेशभूषा केलेला माणूस त्यांच्याकडे येऊ लागला .  मोहिनी घाबरली पण आरुषी मात्र तिच्या जागी ठामपणे उभी होती . कारण त्या मनुष्याने जरी जंगली लोकांसारखी वेशभूषा केली असली तरीही तो मारुतांचा एक विशेष हेर होता . त्याला आरुषीनेच जंगली सैन्यात सहभागी व्हायला सांगितलं होतं . त्याप्रमाणे तो सहभागी झाला होता आणि आता तोच त्यांना जंगली सैन्याच्या ठिकाण्यावर ती घेऊन जाणार होता .

    "  आरुषी मला नाही वाटत तू हे योग्य करतेयस.....  तुम्ही दोघी त्याठिकाणी जाऊन काय करणार आहात ........?
तो माणूस जवळ येत बोलला......
" रुद्र हे सर्व अगोदरच ठरलं होतं . त्यासाठी त्यांच्यात तुला मिसळायला लावलं होतं....
" होय ते मला माहित आहे . पण तुला खात्री आहे का ही प्रलयकारिका काम करेल......?
" होय आता वेळ घालवायला नको लवकर चल......।
" ते सर्व ठीक आहे पण वाटेत पाहण्याच्या तीन टोळ्या आहेत त्यांचं काय......?
" ते आमचं आम्ही बघून घेऊ तू फक्त पुढे जात राहा....
" आरुषी ,  मी सांगतो तुझा विचार बदल . ही आत्महत्या आहे....
" रुद्रा तू माझी इतकी काळजी नको करत जावूस..... मी माझी काळजी घेऊ शकते .  आणि मला कोणी मारायला आलाच तर त्यांची काळजी घ्यायला तू आहेस ........
    तिने लाडीकपणे त्याचे गालगुच्चे घेतले व ते पुढे निघाले.

        रुद्रा पुढे घोड्यावर जात होता त्याच्या मागे दोघी चालत निघाल्या होत्या . ते तिघेही दोन उंच झाडापाशी आले . झाडावरती पहारा देण्यासाठी लाकडाने चौक्या बांधल्या होत्या . त्या ठिकाणी सैनिक होते . त्याबरोबर झाडाखाली आजूबाजूला सैनिकांचा पहारा होता. रुद्र त्या दोन झाडाखालून पुढे गेला पण जेव्हा या दोघी आत निघाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर चार बाण येवून रुतले ...

     त्याठिकाणी  वर  उभारलेल्या एका  सैनिकाचा आवाज आला....
" सुंदरींनो तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी नाही......
      तो एक तगडा पैलवान गडी  होता . त्याच्या कमरेला फक्त वस्त्र होते , बाकी संपूर्ण उघडा होता . बाकी सैनिकही तसेच होते . सर्वात सैनिक बलदंड होते दंड व छखती फुललेली ,  मांड्याची पट फिरत असलेले .  एकुणात ते सर्वजण शक्तिशाली होते
" आत्ताच्या आत्ता माघारी फिरला अन्यथा .....
     त्या सैनिकाचे वाक्य पूर्ण होण्या अगोदर त्याला मागून कुणीतरी जोरात लाथ मारली तो सैनिक खाली आपटला . ज्यांना लाथ मारली , तो सैनिक पुढे येत बोलू लागला . तो बहुदा टोळीचा प्रमुख असावा

      "  मी याच्या वतीने माफी मागतो . तुमच्यासारख्या सुंदर स्त्रियांचा असा अपमान करणं हे कदापि उचित नाही...
     तो आता खाली उतरला होता .  त्या दोघींकडे सरकत होता .  त्याच्या नजरेत स्पष्टपणे वासना दिसत होती .  

       " तुमच्या सौंदर्याचा मान ठेवायला पाहिजे ....
      तो आता आरुषीच्या जवळ पोहोचला होता त्याने हात पुढे केला .  तो आरुषीच्या नको तिथे स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता.....
    
         डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच आरूषीने तिचा खंजीर काढला व एकदम जलद हालचाल केली .  जो हात पुढे आला होता , तो मनगटापासून कापला गेला .  हात कापल्याबरोबर तो जोरात ओरडत मागे सरला व त्या बाणाला थटून खाली पडला .  त्याच बरोबर बाकी सैनिक सावध झाले. आरूषीने मोहिनीकडे  हेतूपूर्वक पाहिले .            मोहिनीला समजले . तिने डोळे मिटले .  आरुषी पुढे सरली .  तो सैनिक अजूनही ओरडत होता . ज्या डोळ्यात वासना होती ते दोन्ही डोळे आरूषीने खंजीराने बाजूला काढले नंतर त्याच खंजीराने तिने त्याच्या काळजाचा वेध घेतला . 

      त्याच्या पाठोपाठ इतर सैनिकांच्या थोड्याफार ओरडण्याचा आवाज येता येता बंद झाला . त्या ठिकाणी जे काही प्राणी होते ते सर्व सैनिकांवरती  तुटून पडले.... आणि काही क्षणात ती पहारा देण्यासाठी असलेली टोळी होत्याची नव्हती झाली .  तेथीलच दोन घोडे घेऊन त्या दोघी पुढे निघाल्या.....

         आयुष्यमान व भरत दोघांचे घोडे सुटून पळत गेले होते . ते जेवणासाठी थांबले असता त्यांचे घोडे शिट्टीचा आवाज ऐकून त्या दिशेने पळत गेल्याचा त्यांच्या लक्षात आलं . ते दोघेही त्या घोड्याच्या मागोमाग गेले आणि काही अंतर जातच त्यांचा एक घोडा परत येताना दिसला.   त्या घोड्याच्या मागून दुसरा घोडा होता ,  परंतु त्यावरती कोणी तरी मनुष्य बसलेला दिसत होता .  आयुष्यमानच्या तळपायाची आग मस्तकाला गेली . अगोदरच त्याला झालेल्या घटना बद्दल वैताग होता . मोहिनीचा विरह सहन होत नव्हता , आणि कुणीतरी त्यांची भलतीच टिंगल करत होते . त्यामुळे जो कोणी मनुष्य घोड्यावर होता त्याच्याकडे पळत जात आयुष्यमाने त्याला घोड्यावरून खाली खेचले . आयुष्यमानने त्याला काहीही न विचारता वैतागून त्याच्या दोन कानाखाली लगावल्या.....

      "   घोडा वरती उडालेल्या मुलीला शोधत आहात ना तुम्ही.....
     शौनक बोलला ...
     पण मोहिनीच्या उल्लेखाने आयुष्यमानला अजूनच राग आला . एक अनोळखी माणूस येतो काय ..आपले घोडे चोरतो काय , आणि मोहिनीच्या नाव घेऊन त्यांना फसवतो काय.....? त्याचा पारा अजूनच चढला , त्याने शोनकलख अजून दोन कानाखाली लगावात त्याच्या पोटात ही गुद्दे मारून दिले.....

     " अरे मला काय मारतोय , मी तुमची मदत करायला आलोय .....! काळी भिंत पडणार आहे ....प्रलय येणार आहे ....... सगळ्या पृथ्वीवरती संकट आहे आणि वारसदाराच्या सभेचा प्रमुख प्रेम आराधना करतोय.....

      आयुष्यमानला आता राग अनावर झाला होता . तो त्याला अजून मारणार होता ,  पण भरतने त्याला मागे ओढत शांत केले.....

  " तुला कसं माहित काय भिंत पडणार आहे ते.... आणि मोहिनी बद्दल तुला कसं माहित....।?  सांग लवकर नाहीतर तुझं काही खरं नाही .....भरतने शोनकला विचारले....

       त्याने त्याच्या कमरेला असलेला कापड बाहेर काढलं   .रुपांतरण कापडावरती असलेले दृश्य दिसण्यासाठी त्याने त्याच्या वरती काहीतरी रसायन टाकले व त्या दोघांना तो कपडा दाखवला.....

    त्यांनी जे काही पाहिलं त्यामुळे त्यांची बोलतीच बंद झाली . शोनक म्हणाला ,  माझे वडील मंदार तंत्रज्ञ आहेत . जेव्हा काळी भिंत बांधली त्या वेळी ते जिवंत होते . त्यांना इतका घाबरलेला मी कधीच पाहिले नाही .  ते उत्तरेला असलेल्या सैनिकी तळावरती गेलेले आहेत . त्यांनीच मला  तूमच्याकडे पाठवलेलं आहे . वारसदाराच्या सभेच्या प्रमुखाला तिकडे घेऊन येण्यासाठी सांगितला आहे......

   ती मरो काळी भिंत आणि मरो सगळे लोक . मला आता काही पर्वा नाही .  वारसदारांची सभा मी आता सोडून देत आहे .  भरत तु सभेचा पुढचा प्रमुख , मी आता चाललोय माझ्या  मोहिनीच्या शोधार्थ.....

   भरतने त्याला समजवायचा प्रयत्न केला , पण तो घोड्यावरती बसला आणि ज्या दिशेने मोहिनी उडत गेली होती त्या दिशेकडे घोडा दामटवत निघाला...

      

***

Rate & Review

Rajendra Raut

Rajendra Raut 2 day ago

Teju

Teju 9 month ago

Dipak Jadhav

Dipak Jadhav 11 month ago

Mate Patil

Mate Patil 12 month ago