Pathlag - 18 books and stories free download online pdf in Marathi

पाठलाग – (भाग-१८)

॥ पर्व दुसरे ॥

दमणमधील ‘वुडलॅंड हॉटेल’ अनेक व्ही.आय.पी आणि व्ही.व्ही.आय.पींनी भरलेले होते. मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर टॅक्सी दिसाव्यात तश्या ऑडी आणि मर्सीडीज पार्कींगमध्ये लागलेल्या होत्या. पोलिसांच्या दोन सेक्युरीटी व्हॅन्स गेटवर अलर्ट होत्याच शिवाय अनेक सेलेब्रेटींचे खाजगी बॉडीगार्ड चेहर्‍यावर मख्ख भाव ठेवुन उभे होतेच.

अर्थात कारणही तसंच होतं. मेहतांची पार्टी म्हणली की ही अशी अनेक बडी थेर आवर्जुन उपस्थीत असायचीच.

हॉटेलच्या बाहेर उभारलेल्या शामियान्यात एक पस्तीशीतील तरुणी (!) शैम्पेनचे घोट घेत बरोबरच्या लोकांशी चर्चा करण्यात मग्न होती. इतक्यात एक वेटर तिच्या जवळ येउन अदबीने उभा राहीला. त्या तरुणीने प्रश्नार्थक नजरेने त्या वेटरकडे पाहीले. वेटरने हातातल्या ट्रे मधील फोन त्या तरुणीच्या हातात दिला आणि तो तेथून निघून गेला.

‘माया स्पिकिंग’, ती तरुणी अत्यंत हळू आवाजात म्हणाली, परंतु तिच्या आवाजातली जरब ती मायाच आहे हे सांगण्यास पुरेशी होती.

पुढची तीस सेकंद माया फोन वर ऐकत होती. शेवटी तिच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटले आणि तिने फोन बंद केला.


दिपकला अचानक खाड्कन जाग आली तसा तो उठून बसला. घामाने त्याचे शरीर ओले-चिंब झाले होते. वेगाने होणाऱ्या श्वासोत्सवाने त्याची छाती वेगाने खाली वर होत होती.

त्याने आजूबाजूला पहिले. एका १० x १२ च्या छोट्याश्या खोलीतील बेडवर तो होता. खिडक्या बंद होत्या आणि पडदे लावलेले होते त्यामुळे वेळेचा नक्की अंदाज येत नव्हता. भिंतीवर फिक्कट पांढऱ्या रंगाचा उजेड देणारी ट्यूब-लाईट चालू होती. बेड जवळच्या टेबलावर काही औषधांच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या.

आपण नक्की कुठे आहोत ह्याचा काहीच अंदाज त्याला येत नव्हता. दिपक बेड वरून खाली उतरला तसं कमरेच्या थोडे वर एक जोरदार कळ आली. दिपक ने शर्ट थोडा वर करून पहिले तेंव्हा त्याला तेथे झालेली जखम दिसली. क्षणार्धात दीपकचे मन भूतकाळात गेले. घडलेला तो सर्व घटनाक्रम त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला.

तो गिड्डा इन्स्पेक्टर, स्टेफनी, दिपकला वाचवण्यासाठी तिने केलेला प्रयत्न, `रन दिपक … रन’, तिची आर्त विनंती. जखमी स्टेफनीला सोडून पळताना त्याला सांगितलेल्या ठिकाणी मिळालेली स्पीड बोट. त्याच्यावर होणारा गोळ्यांचा हल्ला आणि बोट समुद्रात थोडी आत पर्यंत जाताच `सुटलो एकदाचे’ म्हणेपर्यंत लांब पल्ल्याच्या स्नायपर बंदुकीतून आलेली गोळी. गोळीचा नेम चुकला असला तरी त्याच्या शरीराला घासून ती गेली होती.

तलवारीचं गरमं पातं खसकन कोणी निसटतं मारावं तसा भास दिपकला झाला. अतीव वेदनेने तो कळवळुन उठला. परंतु वेदना गोंजारत बसायला वेळ नव्हता. गोळ्यांचे आवाज अजुनही येतच होते. त्याने एका हाताने जखम दाबुन धरली आणि दुसर्‍या हाताने स्पिडबोटचा गेअर बदलुन तिला वेग दिला.

किती मिनीटं, किती तास दिपक बोट चालवत होता त्यालाच माहीत. जखमेतुन अजुनही भळाभळा रक्त वाहत होते. दिपकची शक्ती संपत चालली होती. दिपकने बोटीमध्ये काही खायला, किंवा जखमेला लावायला काही औषध आहे का पहाण्याचा प्रयत्न केला पण काही क्षुल्लक गोष्टी सोडल्या तर त्याच्या हाती काहीच लागले नाही.

दुरवर अथांग समुद्र पसरला होता. दिपकने बोटीचे स्टेअरींग सोडुन दिले आणि बाकड्यावर त्याने स्वतःला झोकुन दिले. कितीतरी वेळ बोट काहीच कंट्रोल नसल्याने कुठेही भरकटत होती. दिपकला स्टेफनीचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. तिच्या पोटात घुसलेली गोळी त्याला आठवली आणि ताडकन तो उठुन उभा राहीला तशी वेदनेची एक सणक त्याच्या शरीरभर पसरली.

विव्हळत तो पुन्हा खाली कोसळला. ग्लानीने त्याचे डोळे मिटत होते. कधीतरी तो बेशुध्द पडला.


दिपकने आठवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला, पण पुढचे त्याला काहीच आठवत नव्हते……

दिपकने एक आवंढा गिळला आणि मग डोळ्यावर हाताचे मनगट ठेवुन तो जरावेळ पडुन राहीला.

थोड्यावेळाने तो बेडवरुन खाली उतरला आणि खोलीच्या दारापाशी गेला. दाराला आतुन कडी नव्हती. त्याने दार उघडायचा प्रयत्न केला परंतु बहुदा दार बाहेरुन बंद होते. दिपकने खोलीत इतरत्र नजर फिरवली. छोटी हॉटेल्स किंवा हॉस्पीटल्समध्ये सर्व्हंट्सला बोलवायला बेल असते तशी एक बेल तेथे होती. त्याने बेलचे बटन दाबले.

दुरवर कुठेतरी ट्रींगsss असा बेलचा आवाज आला. आणि क्षणार्धात बाहेरच्या जिन्यावर पावलांचे आवाज येउ लागले.

दिपक पुन्हा आपल्या बेडवर जाऊन बसला. बाहेरुन येणारी लोक कोण असतील ह्याचा काडीमात्र अंदाज दिपकला येत नव्हता. कदाचीत.. कदाचीत ते पोलिसच असतील तर? दिपक पकडला गेला असेल तर? त्याची शुध्दीवर यायची वाटत बघत खाली दोन हवालदार उभे असतील तर??

दिपकला त्या विचाराने घाम फुटला. आपण बेल वाजवुन घाई तर नाही केली असे त्याला वाटुन गेले. पण आता पर्याय नव्हता.

दाराचे आधी कुलुप आणि मग कडी उघडल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ दोन व्यक्ती आतमध्ये आल्या.

समोर दोन किरकोळ अंगलटीच्या व्यक्ती पाहुन.. आणि अर्थात त्या पोलिस नाहीत हे जाणुन दिपकला हायसे वाटले. “मी कुठं आहे?”, दिपकने विचारले…

“सी-प्रिन्सेस हॉटेल..”, समोरची एक व्यक्ती म्हणाली.

त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक पेन होते. बहुधा हॉटलमध्ये कारकुनी काम करणारा कोणीतरी असावा. बेलचा आवाज ऐकताच तो धावत पळत हातातले काम सोडुन आला होता.

“सी-प्रिन्सेस?? कुठं आलं हे?”, गोंधळुन दिपकने विचारले
“दमण..”, ती व्यक्ती
“दमण!!”, आश्चर्यचकीत होत दिपक म्हणाला.. “मी कधी आलो इथं? कुणी आणंलं मला इथे?”

“एक आठवडा झाला तुम्हाला इथं येऊन.. बेशुध्दच होता तुम्ही. मच्छीमारांना सापडलात तुम्ही समुद्रात. त्यांनी आणलं इथं…”, ती व्यक्ती

“पण इथं रहाण्याचं बिल.. औषधांचा खर्च??”, दिपक
“त्याची तुम्ही काळजी करु नका, तुमचं बिल आणि इतर औषधांचा खर्च भरण्यात आलाय आमच्याकडे..”

“पण कुणी भरले पैसे…”, अधीकच गोंधळत दिपक म्हणाला..

“तुम्ही आराम करा.. आपण नंतर बोलु. मी प्रथम तुम्हाला खायला काही पाठवुन देतो आणि डॉक्टरांना फोन करतो.. ते एकदा तुम्हाला येऊन तपासतील..” असं म्हणुन त्या व्यक्ती जायला निघाल्या..

“गोळी लागली होती मला…”, दिपक
“हो.. माहीती आहे आम्हाला…”, दुसरी व्यक्ती प्रथमच बोलली..
“मग… अं.. काही पोलिस केस वगैरे???”, दिपक

“नाही.. काही नाही.. तुम्ही आराम करा..”, असं म्हणुन त्या दोन व्यक्ती निघुन गेल्या.


दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर येउन दीपकला तपासून गेले. दीपकला आता बरच बर वाटत होत, पण शरीरात प्रचंड अशक्तपणा होता. हॉटेल मधून त्याला वेळो-वेळी नाश्ता, जेवण येत होते. हे का? कश्यासाठी? ह्याचे पैसे कोण भरतेय अश्या गोष्टींचा फारसा विचार करण्याचा त्याने फारसा प्रयत्न केला नाही. काही दिवस त्याने खाणे आणि झोपणे ह्यातच घालवले.

हा सर्व पाहुणचार आठवडाभर चालू होता. एके दिवशी हॉटेलचा मैनेजर त्याच्या खोलीत आला. दीपक एक फिल्मी मैग्झीन वाचण्यात दंग होता.

मैनेजरला पाहताच दीपक उठून बसला.

मैनेजर म्हणाला, “सर उद्यापासून तुम्हाला इथे राहता येणार नाही”
“पण का?” अचंबित होत दीपक म्हणाला

“सर, आता तुमची तब्येत बरी आहे.. त्यामुळे रूमचे अधिक पैसे भरण्यास त्यांनी नकार दिला आहे…..”, मैनेजर

“त्यांनी? म्हणजे कोणी?”, दीपक
“माफ करा सर, ते नाही सांगू शकत….”, मैनेजर

“अरे पण अस अचानक सांगून, मी कुठे जाणार बाहेर?. मला तर इथली काहीच कल्पना नाही”, दीपक
“हो ते बरोबर आहे सर…. पण… “, मैनेजर

काही क्षण शांततेत गेले आणि मग तो मैनेजर परत म्हणाला, “एक करता येईल, जर तुमची स्पीड बोट तुम्हाला नको असेल तर एक गिऱ्हाईक आहे त्यासाठी. तुम्ही ती विकून मिळालेल्या पैश्यातून काही दिवस अजून इथे राहू शकता”

कल्पना तशी चांगली होती. दीपकला हि त्या स्पीड-बोटीचा काही उपयोग नव्हता.

“मी तयार आहे”, दीपक म्हणाला, “पण किती पैसे मिळतील?”
“साधारण १५ हजार मिळतील. तुम्हाला महिनाभरासाठी तेव्हढे पुरेसे आहेत.”, मैनेजर

दीपक तयार झाला.


फारसा प्रयत्न न करता दीपकची निदान एक महिन्याभराची तरी सोय झाली होती.

एके दिवशी दीपक खालच्या बारमध्ये ड्रिंक्स घेत बसला होता, इतक्यात बाहेर एका वेगाने जाणाऱ्या गाडीचे ब्रेक्स लागण्याचा आणि पाठोपाठ धडकण्याचा आवाज झाला.

हॉटेलचा मैनेजर, बारमधली काही लोक आणि दीपक पळत-पळत बाहेर आले.

बाहेर बरीच गर्दी जमली होती. गर्दीमध्ये एक काळ्या रंगाची रोल्स-रॉईस होती आणि गाडीच्या पुढच्या चाकापाशी एक माणूस पाय धरून तळमळत बसला होता. गर्दीमधल्या दोन-चार लोकांनी एव्हाना गाडीचे दार उघडून ड्रायव्हरला बाहेर खेचले होते आणि त्याची धुलाई चालू केली होती.

थोड्याच वेळात पोलिसाच्या शिट्टीचा आवाज कानावर पडला तसा दीपक हळूच गर्दीच्या मागे सरकला. पांढरा पोशाख परिधान केलेला एक पोलिस शिट्टी वाजवत गर्दीच्या दिशेने आला. त्याने लोकांना बाजूला केले आणि गचांड्या खाणाऱ्या ड्रायव्हरला पकडले. अर्थात तो ड्रायव्हर पिलेला होता हे वेगळे सांगायची गरज नव्हती.

त्या पोलिसाने वायरलेस वरून काही संदेश दिले आणि तो तेथे उभ्या असलेल्या लोकांकडून घटनेबद्दल अधिक माहिती घेऊ लागला. थोड्याच वेळात एक जीप तेथे येउन थांबली आणि आतून दोन हवालदार उतरले. त्या पोलिसाने त्या ड्रायव्हरला आणि त्या जखमी माणसाला जीप मध्ये बसवले आणि जीप निघून गेली.

एव्हाना गर्दीही पांगली होती.

उन चांगलेच डोक्यावर चढले होते. त्या पोलिसाने डोक्यावरची टोपी काढून रुमालाने घाम पुसला आणि मग इकडे तिकडे बघत तो बार मध्ये घुसला.

पोलिसाला बघतच मैनेजर अदबीने पुढे धावला.

“काय घेणार सर? व्होडका, फेनी का थंडगार बिअर?”
“थंडगार पाणी दे… ड्युटीवर आहे”, हसत हसत तो पोलिस म्हणाला

“साला नसती आफत झाली…”, पाणी घेत पोलिस म्हणाला
“काय झाल सर?”, मैनेजर

“गाडी बघितली नाही का बाहेर कुणाची आहे? माया मैडमची गाडी आहे. कशी न्हेऊ पोलिस स्टेशनला?, एफ़. आय. आर. पण नाही करता येणार”
“हम्म…”, मैनेजर मान डोलवत म्हणाला

“एक काम कर, कुणी ड्रायव्हर असेल तुझा तर गाडी पाठवून दे बंगल्यावर. मी जातो पोलिस स्टेशनला” अस म्हणून तो पोलिस निघून पण गेला

हॉटेलचा ड्रायव्हर नुकताच गाडी घेऊन बाजारात सामान आणायला गेला होता. त्याला यायला नक्कीच वेळ लागणार होता. तो पर्यंत ती गाडी अशी हॉटेलच्या दारात ठेवणे त्या मैनेजरला कठीण जात होते. त्याची चलबिचल चालु होती.

दीपक हे सगळे लपून पहात होता. ‘माया मैडम’ हे नाव त्याने ह्यापूर्वीही त्या हॉटेल मध्ये अनेकदा ऐकले होते. तिथे येणारे अनेक लोक त्यांच्या मालकीच्या कुठल्या न कुठल्या उद्योग-धंद्यातच काम करणारे असायचे. ह्यावरून ह्या ज्या कोण माया मैदाम आहेत त्या नक्कीच कोण तेरी मोठ्या आसामी आहेत हे दिपकने ताडले होते.

थोडा विचार करुन तो मुद्दाम मॅनेजरसमोर गेला.

“काय झालं? तुम्ही चिंतीत दिसताय!! काही प्रॉब्लेम झालाय का? मी काही मदत करु शकतो का?”, दिपकने विचारले.

दिपकला बघताच मॅनेजरच्या मनात एक आशा निर्माण झाली.

“हो हो.. हे बघ.. तुला गाडी येते का चालवता?”, मॅनेजरने दिपकच्या खांद्यावर हा ठेवत विचारले
“हो.. म्हणजे काय? हा काय प्रश्न झाला..”, दिपक सहजच बोलण्याच्या स्वरात म्हणाला..

“नाही म्हणजे.. ही बघ.. ही बाहेर जी गाडी आहे, ती येईल चालवता..”, बाहेरच्या रोल्स-रॉईसकडे बोट दाखवत मॅनेजर म्हणाला..

“येईल की! आहे काय त्यात. पण काम काय आहे?”, दिपक
“हे बघ.. ही गाडी माया मॅडमच्या बंगल्यावर न्हेऊन सोडायची आहे बस्स… डोन्ट वरी, तुला आत सुध्दा जायची गरज नाही. बाहेरच्या वॉचमनकडे दिलीस तरी खुप झालं. मी तसं फोन करुन सांगुन ठेवतो. जमेल?”, मॅनेजर

“येस्स सर.. मी फक्त जरा फ्रेश होऊन येतो.” असं म्हणुन दिपक आपल्या खोलीत गेला.

दहा मिनीटांनी तो फ्रेश होऊन आला तो वर मॅनेजरने बंगल्यावर फोन करुन परीस्थीतीची कल्पना दिली होती आणि तो दिपकचीच वाट बघत होता.

दिपकला पहाताच तो किल्ली घेऊन दिपककडे गेला. त्याने किल्ली दिपकला दिली आणि बंगल्याचा पत्ता निट समजावुन सांगीतला.

दिपक किल्ली घेऊन बाहेर आला. त्याने कार भोवती एक चक्कर मारली. त्या धडकाधडकीत आणि लोकांच्या धक्काबुक्कीत गाडीचा पुढचा दिवा आणि त्याखाली थोडं डॅमेज झालं होतं.

दिपकने काही क्षण विचार केला आणि मग त्याने गाडी बंगल्याच्या दिशेने वळवली.


माया आपल्या अलिशान दिवाणखान्यात भल्या मोठ्या सोफ्यावर कसल्यातरी विचारात बुडाली होती. इतक्यात टेबलावरचा इंटरकॉम वाजला.

हॅलो वगैरे म्हणायच्या फंदात न पडता ती रिसीव्हर कानाला लावुन पलिकडील व्यक्ती बोलायची वाट पाहु लागली. फोनची रिंग बंद झाली ह्याचा अर्थ ‘माया मॅडमने’ फोन उचलला आहे असा एक अलिखीत दंडक तेथे होता. त्यासाठी ‘माया मॅडमने’ हॅलो, बोला, येस्स, कोण बोलतयं वगैरे तत्सम शब्द उच्चारायची गरज नव्हती.

फोनची रिंग बंद झाली तसा गेटवरुन फोन करणारा वॉचमन म्हणाला, “मॅडम, दिपक म्हणुन कोण तरी आपल्याला भेटायला आले आहेत..”

“मग मला कश्याला फोन केला? टॉक टू माय सेक्रेटरी. आणी अपॉईंटमेंट नसेल तर घरी पाठवुन द्या..”, माया

“मॅडम त्यांच कार संबंधी काही तरी काम आहे..”, वॉचमन
“ओह येस.. आलं लक्षात.. ठिक आहे.. कार आपल्या पार्कींगमध्ये लावुन टाक, आणि त्याला परत जायला दिवाणजींकडुन १००-२०० रु. घ्यायला सांग..”, माया

“पण मॅडम, त्यांनी कार आणलीच नाहीये..”, चाचरत वॉचमन म्हणाला
“काय? कार आणली नाहीये???”, माया

“नाही मॅडम त्यासंबंधीच त्यांना तुमच्याशी बोलायचेय..”, वॉचमन
“ठिक आहे.. त्यांना बसव आत मध्ये आले मी खाली”, असं म्हणुन मायाने फोन ठेवुन दिला.

बाहेरुनच तो टोलेजंग बंगला बघुन दिपक हरखुन गेला होता. आतमध्ये आल्यावर तेथील ऐश्वर्य बघुन त्याचे डोळे आणि तोंड उघडेच राहीले.

ती व्हिजीटींग रुमच एव्हढी लॅव्हीश होती की विचारायची सोय नाही. सारे फर्नीचर, पेंटींग्स, म्युरल्स सर्व काही उंची होते. कोठेही, कोणत्याही गोष्टीत क्वालीटीशी तडजोड केली गेली नव्हती.

दिपक ते सर्व वैभव बघण्यात गुंग होता इतक्यात त्याला मागुन आवाज आला.. “येस्स..”

दिपक दचकुन मागे वळला आणि समोर उभ्या असलेल्या त्या स्त्रीला बघुन तो जागच्या जागी खिळुन गेला. निळसर झाक असलेले डोळे, खांद्याखाली रुळणारे काळेभोर केस, गोरेपान रंग रुप. दिपकला आपलं ह्रुदय क्षणभंर बंद तर नाही झालं नं असंच वाटुन गेलं. त्याने कल्पनाही केली नव्हती की ‘माया मॅडम’ म्हणजे एखादी इतकी सुंदर, तरुण स्त्री असेल. त्याच्या लेखी माया मॅडम म्हणजे एखादी खडुस, कजाग वाटणारी ५०-६० वर्षाची स्त्री होती. त्यामुळे तो अचंबीतच झाला होता.

“येस्स..”, पुन्हा त्याच थंड स्वरात माया म्हणाली..
“मी दिपक..”, दिपकने आपला हात पुढे केला
“कामाचं बोला..”, शेक-हॅन्ड्स न करताच माया म्हणाली..
“हम्म.. मी तुमच्या रोल्स-रॉईस कार संबंधी…”, दिपक
“माहीती आहे मला.. कार कुठे आहे..”, माया
“गॅरेजमध्ये..”, दिपक
“गॅरेज?? का? काय झालं..”, थोडेसे आश्चर्यचकीत होत माया म्हणाली
“गाडीला किरकोळ डॅमेज होते. अशी गाडी तुमच्या इथे आणणार आणि मग परत तुमच्या इथुन कोण तरी गाडी गॅरेजमध्ये घेउन जाणार, त्यापेक्षा मीच गाडी गॅरेजमध्ये सोडुन आलो. उद्या दुपारपर्यंत काम पुर्ण होऊन गाडी तुम्हाला मिळेल..”, दिपक

“आणि पैसे??”
“माया मॅडमची गाडी इथे कोण ओळखत नाही? आणि तुमचे पैसे कुठे पळुन जाणार नाहीत हे इथे प्रत्येकजण जाणतो.. डोन्ट वरी.. उद्या गाडीची डिलिव्हरी झाल्यावरच तो पैसे घेईल…”

असं म्हणुन मायाला बोलायची संधी न देताच दिपक वळुन निघुन गेला.

तो तेथे थांबला असता तर कदाचीत पहील्यांदाच कुणावर इंप्रेस झाल्याचे भाव मायाच्या चेहर्‍यावर त्याने पाहीले असते.

तो हॉटेलवर परत आला तेंव्हा मॅनेजर त्याच्याकडे धावतच आला आणि म्हणाला.. “अरे तु तिकडे जाऊन काय केलेस काय?”

“का? काय झालं?”, दिपक
“माया मॅडमच्या सेक्रेटरीचा फोन होता. त्यांनी आत्ताच्या त्या ड्रायव्हरला काढुन टाकलं आहे आणि रिकाम्या झालेल्या जागी तुला ड्रायव्हरचा जॉब देऊ केला आहे.. तुझी तयारी असेल तर १० मिनीटांमध्ये त्यांना कळवं.. बिलीव्ह मी माय सन.. जॉब ड्रायव्हरचा असला तरी तु माझ्यापेक्षा जास्त कमावशील लक्षात ठेव..” मॅनेजर बोलत होता.

… आणि अश्या रितीने दिपक ‘माया मॅडमच्या’ सेवेत रुजु झाला होता…….

[क्रमशः]