Marathi Poem videos by Pralhad K Dudhal Watch Free

Published On : 02-Apr-2023 01:01pm

155 views

एप्रिल फुल…
यावे अवचित कुणीही
खुशाल टोपी घालून जावे
दिवस कोणता असो सालाचा
आम्ही एप्रिल फुल होत रहावे

मुकी मेंढरे आम्ही कुणीही हाका
दाखवून गाजर बिनधास्त लुटा
दिवसा ढवळ्या सहज फसवावे
आम्ही एप्रिल फुल होत रहावे

पंचवार्षिक सोहळा तो येता
स्वप्ने दाखविणे चाले स्पर्धा
खुर्ची मिळता खूप झुलवावे
आम्ही एप्रिल फुल होत रहावे

शिकलेलो पण हुकलेले आम्ही
शहाणपण आमचे कुचकामी
भेदाभेदात सहजी अडकवावे
आम्ही एप्रिल फुल होत रहावे

दिखाव्याची त्यांची ती भांडणे
अंधारात चालते एकत्र जेवणे
लक्ष विचलित कसेही करावे
आम्ही एप्रिल फुल होत रहावे

उपाशीपोटी मोठ्या त्या बाता
नेत्यांसाठी खातो आम्ही लाथा
मात्र त्यांनी पोटभर चापावे
आम्ही एप्रिल फुल होत रहावे

बोलायची झालीय ती चोरी
सगळीकडे सत्तेची शिरजोरी
मुकाट सहन सारे करावे
आम्ही एप्रिल फुल होत रहावे
….प्रल्हाद दुधाळ.

0 Comments

Related Videos

Show More